अडीच वर्षांपूर्वी सिडकोत झालेल्या गोळीबारप्रकरणी शिवसैनिक अंकुश शेवाळे याला सात दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली अटक करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर व त्यांचा मुलगा दीपक यांना गोवण्यासाठी शेवाळे याला पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे. या कृत्याचा शिवसेनेने तीव्र निषेध केला आहे.
रिपाईचा शहराध्यक्ष प्रशांत जाधव याच्यावर गोळीबार झाला होता. काही दिवसांपूर्वी यातील दोन संशयितांना गुंडाविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या सांगण्यावरून अंकुश शेवाळे यास हकनाक अटक करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, त्यांचा मुलगा दीपक यांचा या गोळीबार प्रकरणाशी संबंध आहे, अशी कबुली देण्यासाठी अंकुश शेवाळे याला अंबड पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे. रविवारी न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता त्याने हा प्रकार सांगितला. मारहाणप्रकरणी वैद्यकीय तपासणीसाठी न्यायालयाने शेवाळे याला जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार त्याची तपासणी करण्यात आली.
न्यायदेवतेवर विश्वास – बडगुजर
या प्रकरणात मला आणि माझ्या मुलाला गोवण्यासाठी अंकुश शेवाळे याला बेदम मारहाण करण्यात आली. आमची नावे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात आहे. आम्ही ही लढाई लढू, जिंकू. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. अंबड पोलिसांच्या भूमिकेवर संशय असून, राजकीय सूडापोटी बेकायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांचे षङ्यंत्र – दत्ता गायकवाड
विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव होणार याची खात्री झाली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून बडगुजर यांच्यासह शिवसैनिकांवर गेल्या काही दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे सत्ताधाऱ्यांचे षङ्यंत्र आहे, ते यशस्वी होणार नाही, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रसंगी या अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.