इस्रोच्या शुक्र ग्रह मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिली. इस्रोने या मोहिमेला ‘व्हीनस ऑर्बिटिंग सॅटेलाइट मिशन’ असे नाव दिले आहे. शुक्रयान 1 या मोहिमेचा पहिला टप्पा आहे. हे शुक्रयान 2028 मध्ये प्रक्षेपित होणार असल्याची घोषणा इस्रोचे संचालक नीलेश देसाई यांनी केली. स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद संस्थेचे संचालक नीलेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत शुक्रयान मोहिमेची माहिती दिली. ‘हिंदुस्थान सरकारने अलीकडेच आमच्या शुक्रयान उपग्रहाला होकार दिला आहे. शुक्रयान हे 2028 मध्ये प्रक्षेपित केले जाईल. शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे, असे देसाई म्हणाले. शुक्र ग्रहावर राहण्यायोग्य वातावरण होते का, ते कसे बदलत गेले, याचा अभ्यास ‘शुक्रयान’ मोहिमेत घेतला जाईल. याशिवाय अन्य ग्रहांवरील पर्यावरण कसे विकसित होते, याचाहीअभ्यास होईल. देसाई यांनी भविष्यातील मंगळ संशोधनाच्या योजनाही सांगितल्या. मंगळ मोहिमेचा एक भाग म्हणून इस्रोचा केवळ मंगळाच्या कक्षेत उपग्रह ठेवण्याचा नाही तर त्याच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करण्याचाही हेतू आहे.