अंतराळवीरांचा मुक्काम वाढणार, अंतराळ मोहीम 90 दिवसांपर्यंत वाढण्याची शक्यता

नासाच्या अंतराळ मोहीमेत सहभागी झालेल्या हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. नासाची अंतराळ मोहीम 90 दिवसांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला नासाची ही अंतराळ मोहीम काही दिवसांची असेल असे बोलले जात होते. मात्र ही मोहीम सुरू होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. बोईंग स्टारलायनरसह सुनीता सहकारी बुच विल्मोर यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये गेली आहे. मात्र हे दोघेही तेथे अडकून पडले आहेत. नासाने स्पष्ट केले की या दोन्ही अंतराळवीरांचा आणखी काही काळासाठी अंतराळातील मुक्काम वाढणार आहे.

परत आणण्याची घाई नाही

अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याची कोणतीही घाई नाही, असे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव स्टिच यांनी सांगितले. नासा स्टारलायनर मिशनचा जास्तीत जास्त कालावधी हा 45 दिवसांनी वाढून 90 दिवस करण्याचा विचार करीत आहे. 5 जूनला दोन्ही अंतराळवीर बोईंग स्टारलायनर पॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी रवाना झाले होते.