नासाने दाखवला विश्वास; हिंदुस्थानी हवाई दलाचा अधिकारी अंतराळात जाणार

हिंदुस्थानी हवाई दलाचा अधिकारी शुभांशू शुक्ला लवकरच इतिहासाला गवसणी घालणार आहे. शुंभाशू आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जाणार असून या ठिकाणी जाणारा तो पहिला हिंदुस्थानी ठरणार आहे. एका खासगी मिशनसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत तो अंतराळात जाणार आहे. या ठिकाणी त्याचा 14 दिवसांचा प्रवास असणार आहे. शुभांशू शुक्लाची याआधी हिंदुस्थानच्या गगनयान स्पेस मिशनसाठी सुद्धा निवड करण्यात आली होती. आता शुभांशूची एक्सियम मिशन-4 (एएक्स-4) साठी निवड झाली असून नासाने ही माहिती दिली आहे. या मोहिमेवर जाणारे चार अंतराळवीरसुद्धा नासाच्या पत्रकार परिषदेत बसले होते. ज्या मिशनसाठी शुभांशूची निवड झालीय ते नासाचे स्पेस एक्स ड्रगन अंतराळात जाणार आहे.

हिंदुस्थानी पदार्थ घेऊन जाणार

या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले शुभांशू मिशनबद्दल बोलताना म्हणाले की, ज्या वेळी मिशनवर जाईन त्यावेळी मी नक्कीच हिंदुस्थानातील काही पदार्थ माझ्या सहकाऱयांसाठी घेऊन जाईन.

फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून यान उड्डाण करेल. या मिशनमध्ये केवळ चार लोक असतील. यात पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. पोलंडचे स्लावोज उझनान्सकी आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश आहे.