ग्रहाला ताऱ्याने गिळले! नासाने दिली दुर्मीळ खगोलीय घटनेची माहिती

एका ग्रहाला त्याच्या ताऱ्याने गिळल्याची दुर्मीळ खगोलीय घटना मे 2020 मध्ये घडली. ही घटना नेमकी कशी घडली, याची माहिती आता नासाने दिली आहे. हा ग्रह त्याच्या आयुष्याच्या अखेरीस फुगलेल्या आणि रेड जायंट अशा ताऱ्यामध्ये विलीन झाला आणि त्याचा विनाश झाला, असे खगोल शास्त्रज्ञांनी सांगितले.

नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने केलेल्या नव्या निरीक्षणानुसार ग्रहाचा नाश सुरुवातीला जसा वाटला त्यापेक्षा वेगळा झाला. तारा ग्रहावर येण्याऐवजी ग्रह ताऱ्यावर आला. विनाशकारी परिणाम झाला आणि ग्रहाचा मृत्यू झाला.

जेम्स वेब दुर्बिणीने नोंदवलेल्या नंतरच्या घटनेवरून हे स्पष्ट होते की, या घटनेचा शेवट खूपच नाट्यमय होता. या घटनेनंतर त्या ताऱ्याभोवती गरम वायूचे वर्तुळ आणि थंड धुळीचे ढग दिसून आले. आपल्याला माहीत आहे की, ग्रहाच्या मृत्यूच्या काळात ताऱ्यातील बराचसा पदार्थ बाहेर काढला जातो. हॉस्ट ताऱ्यातून बाहेर काढलेला धूळयुक्त पदार्थ म्हणजे या घटनेचा वस्तुनिष्ठ पुरावा आहे, असे खगोल शास्त्रज्ञ रायन लाऊ यांनी सांगितले. रायन लाऊ हे ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रकाशित लेखाचे लेखक आहेत.

हा तारा आपल्या आकाशगंगेत पृथ्वीपासून सुमारे 12 हजार प्रकाशवर्षे अंतरावर अक्विला नक्षत्राच्या दिशेने स्थित आहे. हा तारा आपल्या सूर्यापेक्षा किंचित लालसर आणि कमी तेजस्वी आहे आणि त्याच्या वस्तुमानाच्या सुमारे 70 टक्के आहे.

नेमके काय घडले?

अखेर ग्रहाने ताऱ्याच्या वातावरणात शिरायला सुरुवात केली. जसा ग्रह आत येत होता तसतसा ताऱ्याभोवती एक प्रकारचा डाग पडू लागला. त्याच्या शेवटच्या स्प्लॅशडाऊनमध्ये ग्रहाने ताऱ्याच्या बाह्य थरांमधून वायू बाहेर फेकला असेल. कालांतराने वायूतील जड घटकांचे धुळीत रूपांतर झाले, असे हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे टीम सदस्य मॉर्गन मॅकलिओड म्हणाले.

संशोधकांचा असा अंदाज आहे की, हा ग्रह एकेकाळी गुरू ग्रहाच्या आकाराचा होता. तो ताऱ्याच्या अगदी जवळून फिरत होता. बुधाच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या कक्षेपेक्षाही जवळून. लाखो वर्षांपासून हा ग्रह ताऱ्याच्या जवळून फिरत होता. त्यामुळे विनाशकारी परिणाम झाला.