नासामध्येही कर्मचारी कपात; शास्त्रज्ञ, इंजिनीअर्सना लागली भविष्याची चिंता

नुकतेच ‘नासा’ने कर्मचारी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिने अंतराळात राहून सुखरूप परतल्याचा आनंद साजरा करताना दिसले. मात्र आता तिथला ‘मूड’ बदलला आहे. जगभरातील अन्य पंपन्यांप्रमाणेच नासामध्येही कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे तिथले शास्त्रज्ञ, इंजिनीअर, कर्मचारी आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. नासाच्या वॉशिंग्टन डीसी येथील मुख्यालयात टप्प्याटप्प्याने टाळेबंदी केली जात आहे. 10 मार्च रोजी लक्षणीय कर्मचारी कपात करण्यात आली. तीन कार्यालयांना याचा फटका बसला. मुख्य शास्त्रज्ञांचे कार्यालय आणि तंत्रज्ञान, धोरण आणि रणनीती कार्यालयासह अन्य कार्यालये बंद झाली. ट्रम्प यांच्या कर्मचारी कपात धोरणामुळे अनेक शास्त्रज्ञ, इंजिनीअर, प्रशासकीय कर्मचारी यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे.

कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवल्या

कार्यवाहक प्रशासक जेनेट पेट्रो यांनी ईमेल पाठवून या संभाव्य बदलाची कल्पनी दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात 23 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांनी 30 दिवसांची नोटीस दिली. 30 एप्रिलपर्यंत काम करता येईल असे सांगण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्यांना कोणतेही बोनस पॅकेज मिळणार नसल्याने नाराजी व्यक्त होतेय.