
प्रत्येक घरात नळाने शुद्ध पाणी देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली ‘जलजीवन मिशन’ योजना ही महाराष्ट्रात सपशेल फेल झाल्याची कबूली महायुती सरकारमधील मंत्र्यानेच दिली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी पत्रकारांशी बोलताना या योजनेचे वाभाडे काढले आहेत. केंद्र सरकारने ही योजना योग्य प्रकारे राबवली नसल्याचे त्यांनी सांगितले.
”मी हे मान्य करतो की आताच्या घडीला जनजीवन ही फेल योजना आहे. केंद्र सरकारने सुद्धा मान्य केले आहे की ही योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आहे’, असे झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खूश आहेत – नरहरी झिरवळ
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता महायुती सरकारमधील मंत्र्यानेच पलटी मारली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे कुणीच म्हटले नाही, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये परिपूर्ण आहेत आणि त्या दीड हजारांमध्येच खूश आहेत, असे वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले आहे.