
पाणीटंचाईमुळे आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांची घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशातच केंद्र सरकारने सुरू केलेली जलजीवन योजना फेल झाल्याने लोकांना त्रास होत असल्याचे सांगत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
प्रत्येक घरात नळाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मोदी सरकारने जलजीवन योजना सुरू केली खरी, पण ही योजनाच आजच्या घडीला पूर्णपणे फेल झाल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले. जलजीवन मिशनची योजना कुणी तयार केली, त्याच्या गाईड लाईन कशा बनवल्या याची माहिती नाही. पण, आज केंद्र सरकारपण मान्य करत की ही योजना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. जलजीवन योजनेची अनलबजावणी करताना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजनेचा फेरआढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
माणसी 20 लिटर पाणी द्या
दोन तीन वर्षापासून उष्णता वाढत आहे ,बाष्पीभवन होत आहे. माझ्या मतदारसंघातही पाण्याची टंचाई आहे. जिथे पाणी संपणार आहे, तिथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माणसी 20 लिटर पाणी देण्याचा मुद्या उपस्थित करणार असल्याचे झिरवाळ म्हणाले.