एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळलं; अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अटक

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिची बहीण आलिया (वय – 43) हिला अमेरिकेमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळण्याचा आरोप तिच्यावर आहे. याच दुहेरी हत्याकांडाप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात आलिया हिने न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे एका गॅरेजला आग लावली होती. या आगीमध्ये जळून तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स (वय – 35) आणि त्याची मैत्रीण अ‍ॅनास्तेसिया स्टार एटीन (वय – 33) हिचा मृत्यू झाला होता. ईर्ष्येच्या भावनेतून आलिया हिने हे कृत्य केले होते. आता याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आलिया हिने गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथील एका दुमजली गॅरेजला आग लावली होती. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी तिने एडवर्डसह त्या मैत्रिणीला ‘तुम्ही आज मरणार आहात’, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर तिने गॅरेजला आग लावून दिली.

आलियाने गॅरेजला आग लावली तेव्हा एडवर्ड हा झोपलेला होता. आगीची माहिती मिळताच त्याची मैत्रीण अ‍ॅनास्तेसिया ही धावत त्याच्याजवळ गेली. मात्र तोपर्यंत आग संपूर्ण गॅरेजमध्ये पसरली होती. दोघांनाही या आगीतून बाहेर पडता आले नाही. धुर आणि भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला.

एडवर्डच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, एडवर्ड आणि आलियाचे वर्षभराआधी ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतरही ती त्याची पाठ सोडत नव्हती. एडवर्ड आणि अ‍ॅनास्तेसिया हे दोघे रिलेशनशिपमध्ये नव्हते, तर ते चांगले मित्र होते.

दरम्यान, आलिया फाखरी हिला याप्रकरणी जामीनही मंजूर करण्यात आला होता. मात्र तिने जामीन नाकारला आहे. तिच्यावर आग लावणे, खून करणे असे आरोप लावण्यात आले असून यात ती दोष आढळल्यास तिला आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी अद्याप नर्गिस फाखरी हिने प्रतिक्रिया दिलेली नाही, तर तिच्या आईने मुलगी असे काही कृत्य करेल यावर आपला विश्वास बसत नसल्याचे म्हटले.