मोदींचे दोन दिवस ध्यान; दोन हजारांहून अधिक पोलीस, खासगी बोटी, पर्यटकांना बंदी

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले. भगवती अम्मन मंदिरात पूजाअर्चा करून स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे उभारण्यात आलेल्या ध्यान मंडपम येथे त्यांनी ध्यानधारणेला सुरुवात केली. 1 जूनपर्यंत म्हणजेच तब्बल 45 तास ते ध्यानधारणा करणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कन्याकुमारीत तब्बल दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या दिमतीला खासगी बोटीही असणार आहेत.

जोपर्यंत मोदी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे थांबतील तोपर्यंत त्यांच्या ध्यानधारणेत कुणी व्यत्यय आणू नये यासाठी पर्यटकांनाही बंदी असणार आहे. आजपासून शनिवारपर्यंत समुद्रकिनारी पर्यटक आणि खासगी बोटींना फेरी मारण्याची परवानगी नसेल. मुळे कन्याकुमारीत वीकेण्ड घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

तटरक्षक दल आणि नौदलही कन्याकुमारीतील प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून असणार आहे. आज पोलीस अधीक्षक ई. सुंदरावथनम आणि तिरुनेलवेली रेंजचे पोलीस महानिरीक्षक प्रवेश कुमार यांनी राज्य अतिथीगृह, बोट जेटी, हॅलिपॅड आणि रॉक स्मारक येथील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार संपल्यानंतर मोदींनी केदारनाथच्या गुहेत ध्यानधारणा केली होती.

डीएमकेची जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार

डीएमकेने मोदींच्या दौऱयाचा विरोध करत याप्रकरणी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार नोंदवली आहे. ध्यानधारणेचे कुठलेही मीडिया कव्हरेज करण्यासाठी परवानगी देऊ नये, असेही तक्रार अर्जात म्हटले आहे. न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे हे पत्र देण्यात आले आहे.

मोदींची ध्यानधारणा सुरू

मोदी गुरुवारी सायंकाळी कन्याकुमारी येथे पोहोचले. सर्वात आधी त्यांनी भगवती अम्मन मंदिरातील गर्भगृहात जाऊन पूजाअर्चा केली. यावेळी विशेष आरतीही करण्यात आली. त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या आणि त्यांची आई श्री सारदा देवी तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे 45 तासांच्या ध्यानधारणेला सुरुवात केली. 1 जूनपर्यंत त्यांची ध्यानधारणा सुरू राहणार आहे.

विवेकच नाही त्यांची ध्यानधारणा कशासाठी? -काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकापासून खूप अंतर लांब आहेत. असे मोदी विवेकानंदांच्या स्मारकामध्ये जाऊन ध्यानधारणा कशासाठी करत आहेत? ज्या माणसामध्ये विवेक असेल त्याला ध्यानधारणा करून समाधान मिळेल. मोदींनी भाषणांमध्ये व्होट जिहाद, मंगळसूत्र खेचतील या गोष्टी केल्या. या विवेकाने बोलण्याच्या गोष्टी आहेत का? शो ऑफसाठी ते कन्याकुमारीला जात आहेत का, अशा शब्दांत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदींच्या दौऱयावरून तोफ डागली आहे. आमचा ध्यानधारणेबाबत आक्षेप नाही, मात्र शांतता काळात अप्रत्यक्षरीत्या प्रचार होऊ नये. तसे घडले तर आचारसंहितेचे ते उल्लंघन आहे, असे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सोशल मीडियावर गो बॅक मोदी ट्रेंड

मोदींच्या कन्याकुमारी येथील आगमनाआधीच सोशल मीडियावर हॅशटॅग गो बॅक मोदी ट्रेंड सुरू झाला. मोदी यांनी ध्यानधारणेची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.