मोदींचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्ताकडे सुरू आहे; पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयात येत आहेत. संघाचा इतिहास हा विभाजनाचा राहिला आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याने त्यांचा प्रवास सूर्योदयाकडून सूर्यास्ताकडे होत असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दोन समाजांमध्ये दरी निर्माण करणारा संघाचा प्रवास आहे. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदलली आहे. ते काही काळ मुस्लिम लीगसोबतही होते. आता संघाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान येणार आहेत. ते अनेक वर्षांनी नागपूरमध्ये या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यामुळे सूर्योदयाकडून सूर्यास्ताकडे त्यांचा प्रवास सुरू असल्याचे दिसते. मोदी आणि त्यांच्या पक्षाला संघ कोठे ठेवणार, याची चर्चा यावेळी बैठकीत होऊ शकते, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. पंतप्रधान झाल्यानंतर एवढ्या वर्षांनी ते संघ मुख्यालयात येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या विजयात मोदी यांचा चेहरा नसून संघाची शक्ती आहे, हे मोदी यांना पटले असावे, म्हणूनच ते येत असतील, असेही वडेट्टीवार म्हणाले.