मोदी आले, महागाई वाढली; मित्तल, अंबानींना बळ, गरीबांच्या पाठीवर वळ

नरेंद्र मोदी यांनी कुबडय़ा घेऊन सरकार स्थापन केले. पंतप्रधान पदाची शपथ घेताच आणि कुबडय़ा घेऊन सत्ता स्थापन करताच महागाईत वाढ झाल्याचे समोर आले आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि कुमार मंगलम बिर्ला यांना बळ दिले. पण गरीबांच्या पाठीवर मात्र महागाईचे वळ उठल्याचे मोदींना दिसलेले नाही. या तिघांनी टेलीकॉम टेरीफ म्हणजेच दरात 20 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे देशात महागाईत 0.20 टक्क्यांची वाढ होऊ शकते. एनडीए सरकारमधील दूरसंचार मंत्रालयाच्या पाठिंब्यानेच तिघांनी दूरसंचार सेवेच्या दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही वाढत्या महागाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

डॉय बँकेने महागाईबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून इंधन आणि अन्नधान्य सोडून महागाईच्या दरात तब्बल 3.8 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा लहरीपणाही महागाईत वाढ होण्याचे एक मुख्य कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. जुलैपासून दूरसंचार सेवेच्या दरात वाढ होणार असून प्रत्येक महिन्याला महागाईत 0.85 टक्के वाढ होण्याची भीती डॉयच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दूरसंचार सेवेच्या दरात वाढ झाल्यानंतर 2025 या आर्थिक वर्षात महागाईचा दर 0.20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

मोदींच्या अडीच तासांच्या भाषणात महागाईचा उल्लेख नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत तब्बल अडीच तासांचे भाषण दिले. परंतु त्यांच्या भाषणात गगनाला भिडलेल्या महागाईचा अजिबात उल्लेख नव्हता, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. महागाई वाढत चालली आहे, मोदी केवळ भाषण देण्यात व्यस्त आहेत, अशी टीका खरगे यांनी एक्सवरील पोस्टद्वारे केली आहे.