‘वॉर रुकवा दी’वाले मोदी मॉस्कोत असतानाच, रशियाचा युक्रेनमधील बाल रुग्णालयावर हल्ला, 41 मृत्युमुखी

‘वॉर रुकवा दी’वाले पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोत असतानाच रशियाने युक्रेनमधील बाल रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागली. यात 41 जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 170 हून अधिक नागरिक जखमी झाले. कीव्हमध्ये हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर तब्बल 600 हून अधिक रुग्णांना रुग्णालयातून दुसरीकडे हलवण्यात आले. सगळीकडे सिमेंट, मातीचा ढीगारा आणि किंकाळय़ा, आक्रोश ऐपू येत होत होता. जिकडे तिकडे रक्ताचा सडा पडला होता. हल्ल्यानंतर काही वेळातच रुग्णालयाची इमारत कोसळली. यात 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला.

रुग्णालयात गर्दी असताना हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आज तत्काळ विशेष बैठक बोलावली. या बैठकीत दोन्ही देशांमधील रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. त्यापूर्वी झेलेन्स्की यांनीही रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी देशाच्या लष्करी अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावली. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत.

– मोदीजी ने वॉर रुकवा दी और फीर हमारी बस निकाली अशी जाहिरातबाजी भाजपाने लोकसभा निवडणुकीदरम्यान केली होती. त्यावर काँग्रेसने वॉर रुकवा दी ना पापा असे म्हणत भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते

– बाल रुग्णालयात रशियाच्याच क्षेपणास्त्रांचे तुकडे मिळाल्याचा दावा युव्रेनने केला. रुग्णालयाचा 60 ते 70 टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे.

– हॉस्पिटलच्या ढिगाऱयाखाली आणखी काही मुले आणि नागरिक दबले असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
– ज्या ठिकाणी क्षेपणास्त्र डागण्यात आली तिथे कमीत कमी 20 मुलांवर उपचार सुरू होते.

युद्धाने प्रश्न सुटत नाहीत – नरेंद्र मोदी
युव्रेनमध्ये रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियात केलेल्या भाषणादरम्यान जगाला शांतीचा संदेश दिला. युद्धाच्या मैदानात अडचणींवरील उपाय सापडत नाहीत, कोणत्याही प्रकारचे प्रश्न सुटत नाहीत. शांततेसाठी चर्चेची अधिक गरज असते. हिंदुस्थान हा नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे. कारण, युद्ध हा अडचणींवरील उपाय नाही. मला शांततेची अपेक्षा आहे. मी शांततेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहे, असे मोदी म्हणाले.