
महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरूच राहणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र ओरबाडता, मुंबईची लूट करता आणि अर्थसंकल्पातही महाराष्ट्राची निराशा करता, असा संताप व्यक्त करतानाच, मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ योजना सुरू केलेली दिसते, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली. पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राला अपेक्षित असे काहीही मिळाले नाही. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच राहणार आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे,’’ अशी जळजळीत प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.