मोदींना गोरगरिबांविषयी कळवळा नाही, अमित शहांचा फक्त चेहराच माणसाचा; मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आले आहेत. अमित शहांचा फक्त चेहराच माणसाचा आहे. गरिबांचा मुडदा पाडणारे हे लोक आहेत. नरेंद्र मोदी कधी गरिबांविषयी बोलतात का? त्यांना गोरगरिबांविषयी कळवळा नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही हे तुम्ही एकदा स्पष्ट करा, असेही जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटीत पाचव्यांदा उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहांनी केलेल्या भाषणाची जरांगे यांनी चिरफाडच केली. तुम्हाला कधी गरिबांविषयी कणव वाटली? मोदी कधी गोरगरिबांविषयी बोलतात? अमित शहांचा फक्त चेहराच माणसाचा आहे! गरिबांचा मुडदा पाडणारे हे लोक आहेत, असा आसूड जरांगे यांनी ओढला. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपची यासंदर्भात काय भूमिका आहे असा सवाल जरांगे यांनी केला.

आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण सुरू असल्याचा आरोप प्रसाद लाड यांच्यासारखे बांडगुळे करतात. गेल्या वर्षभरापासून आम्ही फक्त आरक्षणाचीच मागणी करत आहोत. आरक्षण द्या, आम्ही राजकारण करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. राजकारण हा आमचा प्रांत नाही. परंतु तुम्ही आरक्षण देत नाही म्हणून तुम्हाला बाजूला करून आम्हाला तेथे बसावे लागेल, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

थांबा, येवल्यातच उपोषणाला बसतो!
मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू झाले की ओबीसींचीही यात्रा निघाली. हे छगन भुजबळांचेच कारस्थान आहे. भुजबळांना काहीही करून दंगल घडवून आणायची आहे. आमच्याकडे रॅली काढता, मग मी आता येवल्यातच उपोषणाला बसतो. नाशिक, येवला येथे उपोषणासाठी परवानगी मागितल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

प्रकृती खालावली
उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. पाण्याचा थेंबही घेत नसल्यामुळे त्यांना प्रचंड थकवा आला आहे. आरोग्य पथकाने तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले. शरीरातील साखरेचे प्रमाणही घटले असून नाडीचे ठोकेही मंदावले आहेत. मनोज जरांगे हे फक्त तपासणी करू देतात, उपचारासाठी प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.