मोदींचं सरकार बहुमतमुक्त; संजय राऊत यांचा राज्यसभेत हल्ला

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारे नरेंद्र मोदींचे सरकारच जनतेने बहुमतमुक्त केले आहे. हे सरकार खोटारडे आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रत्येक पानावर खोटारडेपणा आहे. चार सौ पारचा नारा देणाऱ्यांचा नारा जनतेने 240 जागांमध्येच गुंडाळला आहे. हे बहुमताचे सरकार नाही तर बहुमतमुक्त सरकार आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना संजय राऊत यांनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले. देशाचे राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख असतात. आम्ही त्यांचा सन्मान करतो, मात्र राष्ट्रपतींच्या अभिभाषणात काय आहे तर प्रत्येक पानापानावर खोटारडेपणा आहे, असा टोला त्यांनी लगावला.

चार सौ पारचा नारा निवडणुकीवेळी दिला जात होता. जनतेने यांना 240 मध्येच गुंडाळले आहे. हे सरकार बहुमताचे नाही तर बहुमतमुक्त सरकार आहे. जे काँग्रेसमुक्त भारताचा नारा देत होते तेच प्रत्यक्षात बहुमतमुक्त झाले आहेत, अशी टोलेबाजीही खासदार राऊत यांनी यावेळी केली.

…तर दहीसाखर राहुल गांधींच्या हातावरही घाला…

देशाचे राष्ट्रपती हे निष्पक्ष असतात व संवैधानिक प्रमुख असतात, असे मानले जाते. मात्र यावेळी जरा विचित्र असे चित्र राष्ट्रपती भवनात दिसले. नरेंद्र मोदी हे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेले असता त्यांच्या हातावर राष्ट्रपतींनी दहीसाखर घातली. आम्ही राष्ट्रपतींचा सन्मान करतो, मात्र हे संसदीय प्रथा -परंपरेमध्ये बसणारे नाही. राष्ट्रपती निष्पक्ष असतात मग अशीच दहीसाखर राहुल गांधी यांच्या हातावरही घाला, असे खासदार राऊत म्हणाले. राष्ट्रपतींवर टीकाटिप्पणी नको, असे पीठासीन अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.