मोदी सरकारने जनतेच्या पाठीत आणि छातीतही खंजीर खुपसलाय! राहुल गांधी यांनी फोडून काढले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या काळात मध्यमवर्गीयांना थाळ्या वाजवायला सांगितल्या, त्यांनी वाजवल्या. मोबाइल फोनचे टॉर्च लावायला सांगितले, त्यांनी लावले. आता त्यांनी अर्थसंकल्पाद्वारे त्यांच्या छातीत आणि पाठीत खंजीर खुपसलाय… अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान एनडीए सरकारला अक्षरशः फोडून काढले. प्रचंड आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांना सत्ताधाऱ्यांनी गदारोळ करून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, राहुल गांधी यांनी आपल्या शैलीत अर्थसंकल्पातील पोकळ तरतुदींवर जोरदार घणाघात केला.

राहुल गांधी म्हणाले, अर्थसंकल्पात इंडेक्सेशन रद्द करून पाठीत खंजीर खुपसला तर कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजेच भांडवली नफ्यावरील कर वाढवून छातीत खंजीर खुपसला. हा कर 10 वरून 12 टक्क्यांपर्यंत नेला. ही अत्यंत दुःखद बाब आहे. मात्र, इंडिया आघाडीसाठी हा एक छुपा फायदा आहे. कारण, मध्यमवर्गीय आता तुम्हाला सोडून जात आहेत आणि आमच्याकडे येत आहेत, असा सणसणीत टोलाही राहुल गांधी यांनी एनडीए सरकारला लगावला.

महाभारतात चक्रव्यूहात अडकवून अभिमन्यूला मारण्यात आलं. आज 21 व्या शतकातही एक चक्रव्यूह तयार केला गेला आहे. हा चक्रव्यूह कमळाच्या आकाराचा आहे. त्याचे चिन्ह पंतप्रधान मोदी आपल्या छातीवर लावून फिरतात. जे अभिमन्यूबरोबर करण्यात आलं, तेच आज देशातील जनतेबरोबर केलं जात आहे. तरुण, शेतकरी, महिला, छोटे उद्योजक यांना या चक्रव्यूहात अडकवलं जात आहे.राहुल गांधी

सहा जणांचे चक्रव्यूह

महाभारतात कुरुक्षेत्रावर अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वथामा आणि शकुनी या  सहा जणांनी विश्वासघाताने मारले. आजही चक्रव्यूहाच्या मध्यभागी सहा जण असून ते देशाला कंट्रोल करतात. नरेंद्र मोदी, अमित शाह, अदानी, अंबानी, मोहन भागवत आणि अजित डोवाल हे ते सहा जण आहेत. मात्र हे चक्रव्यूह भेदण्याची हिंमत इंडिया आघाडीकडे आहे, असे राहुल यांनी ठणकावले.

आज देशातील तरुणांपुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारी आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होत आहेत. गेल्या 10 वर्षांत 70 वेळा या परीक्षांचे पेपर लीक झाले. या पेपरफुटीबाबत या अर्थसंकल्पात एका शब्दाचाही उल्लेख नाही.

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन काळे कायदे, कमजोर जमीन अधिग्रहण बिल आणि पिकांना कमी किंमत सारखे चक्रव्यूह बनवले. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी एमएसपीची कायदेशीर गॅरंटी मागितली. पण, सरकारने त्यांना सीमेवरच रोखले, असे राहुल  गांधी म्हणाले.

देशातील मागासवर्गीय युवा अभिमन्यू नाहीत, तर अर्जुन आहेत

चक्रव्यूह बनवणाऱ्या पद्मव्यूहवाल्यांना गैरसमज आहे. त्यांना वाटते, देशातील मागासवर्गीय, युवा अभिमन्यू आहेत; पण ते अभिमन्यू नाहीत, तर अर्जुन आहेत. ते तुमचे चक्रव्यूह तोडून, फोडून टाकतील, असेही राहुल गांधी ठामपणे म्हणाले.

चक्रव्यूहामागे तीन शक्ती

21 व्या शतकातील चक्रव्यूहामागे तीन शक्ती काम करत आहेत. एक म्हणजे भांडवलदारांची एकाधिकारशाही, दुसरे म्हणजे देशातील तपास संस्था आणि तिसरे म्हणजे राजकीय शक्ती. आज संपूर्ण देशाची संपत्ती केवळ दोन-तीन व्यक्तींच्या हातात आहे. देशातील तपास संस्थांचा वापर करून विरोधकांवर दबाव आणला जातो आहे’’, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

जातनिहाय जनगणना करणारच!

केवळ  20 अधिकाऱ्यांनी मिळून हिंदुस्थानचे बजेट तयार केले.  बजेटपूर्वी हलवा समारंभाचा फोटो येतो. त्या फोटोत केवळ एक आदिवासी आणि एक अल्पसंख्याक दिसतो. बजेटच्या हलव्याचे वाटप होत आहे, पण यात देशातील 73 टक्के लोक दिसत नाहीत, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या  हसत सुटल्या. या गंभीर मुद्दय़ाची खिल्ली उडवली.  कुठल्याही परिस्थितीत जातनिहाय जनगणना या सभागृहातच मंजूर करून घेणार आणि वंचितांना न्याय मिळवून देणार असल्याचेही राहुल गांधी ठामपणे म्हणाले.

ए 1 आणि ए 2 (अदानी आणि अंबानी) हे दोन लोक हिंदुस्थानचे इन्फ्रास्ट्रक्चर कंट्रोल करतात. त्यांच्याकडे विमानतळ आहेत, दूरसंचार यंत्रणा आहेत, बंदरे आहेत आता ते रेल्वेतही घुसत आहेत. त्यांच्याकडे हिंदुस्थाच्या धनाची मोनोपॉली आहे.  जर तुम्ही म्हणत असाल की त्यांची नावे घेऊ नका तर मग तुम्हीच सांगा काय नावे घेऊन बोलू. आम्ही तर त्यांच्याबद्दल बोलणारच, असे राहुल गांधी ठामपणे म्हणाले.

सैन्यातील जवानांना अग्निवीरच्या चक्रव्युहात अडकवले

एनडीए सरकारने सैन्यातील जवानांना अग्निवीरच्या चक्रव्युहात अडकवले आहे. अर्थसंकल्पात अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एका रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही. तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता. परंतु, जेव्हा अग्निवीरांच्या मदतीची आणि जवानांना आर्थिक मदत देण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला अर्थसंकल्पात एक रुपयाही दिसत नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी आदी म्हटले होते, शहीद अग्निवीराच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत दिली गेली. पण ते खोटे होते. त्या शहीद अग्निवीराच्या कुटुंबीयांना इन्शुरन्सचे पैसे दिले गेले होते. त्यांना आर्थिक मदत दिली गेली नाही. हेच खरे आहे. हे कुणी नाकारू शकत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

जातनिहाय जनगणनेच्या गंभीर मुद्दय़ावर अर्थमंत्री हसल्या

संसदेत राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केवळ हसत सुटल्या. डोक्यावर हात मारून, चेहरा लपवून त्यांनी या गंभीर मुद्दय़ाची खिल्ली उडवली. याबाबत राहुल गांधी यांनी संसदेत तसेच एक्सवरूनही सीतारामन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशातील 90 टक्के लोकसंख्येशी निगडित अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दय़ावर अशी उपेक्षापूर्ण प्रतिक्रिया देऊन भाजपाची मानसिकता, त्यांची इच्छा आणि नियतीवरून पडदा उठला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.