प्रज्वल रेवन्नाला कर्नाटक सरकारने पळू दिलं, आधी प्रचार करणाऱ्या मोदींनी हात झटकले

भाजप आघाडीत सामील झालेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा खासदार नातू प्रज्वल रेवन्नाच्या सेक्स स्कँडलचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले आणि अवघ्या देशात संतापाची लाट उसळली. ही लाट रेवन्नासह त्याला मत देऊन आपले हात बळकट करा असं म्हणणाऱ्या मोदींविरोधातही उसळली आहे. पण, इतकं होऊनही पंतप्रधान मोदींनी मात्र या प्रकरणी कर्नाटक सरकारवर खापर फोडलं आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रेवन्ना याला हसन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. प्रज्ज्वल याला मत देऊन आपले हात बळकट करा, असं आवाहन त्याच्या प्रचारार्थ आलेल्या मोदींनी कानडी जनतेला केलं होतं. मात्र, प्रज्ज्वल रेवन्ना याचे महिलांवर अत्याचार करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्ज्वलवर कारवाईची मागणी जोर धरू लागली. दरम्यान, प्रज्ज्वल हा राजकीय पासपोर्टचा वापर करून जर्मनीला पळाला असून त्याच्याविरुद्ध ब्ल्यु कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

आधी प्रज्ज्वलसाठी मतं मागणाऱ्या मोदी यांनी त्याच्यावर झालेल्या आरोपांनंतर जबाबदारी मात्र कर्नाटक सरकारवर ढकलली आहे. टाइम्स नाऊ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवन्ना प्रकरणातून हात झटकले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे होतात तेव्हा संबंधित राज्यांच्या सरकारांची ती जबाबदारी असते, त्यामुळे त्यांनी या प्रकरणात कर्नाटक सरकार दोषी असल्याचं मोदींनी या मुलाखतीत म्हटलं आहे. तसंच, कर्नाटक सरकारने हे प्रकरण दाबून ठेवल्याचा आरोपही त्यांनी या मुलाखतीत केला आहे.