मोदींची टीका…टीका… आणि टीका पंडित नेहरू ते राहुल गांधी

देशाच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे पंडित नेहरू, इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. मोदींच्या भाषणातील बहुतांशी भाग केवळ गांधी-नेहरू कुटुंब आणि काँग्रेसवर टीका करणारा होता.

मोदी म्हणाले, संविधानाचा 75 वर्षांचा प्रवास हा एक संस्मरणीय प्रवास आहे. आपल्या संविधान निर्मात्याची दैवी दृष्टी आणि योगदान आहे. हिंदुस्थान केवळ प्रचंड लोकशाही राष्ट्र नाही तर लोकशाहीची जननी आहे. संविधानाचे महत्व सांगण्यासाठी मोदी यांनी यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुरुषोत्तमदास टंडन आणि डॉ. राधाकृष्णन या तीन दिग्गज नेत्यांचे विधान वाचून दाखविले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, नेहरू-गांधी कुटुंबाला लक्ष्य केले. 1947 ते 1952 या काळात देशात इलेक्टेड नाही तर सिलेक्टेड सरकार होते. 1952 मध्ये ऑर्डियन्स करून संविधानात दुरुस्ती केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला. पंडित नेहरूंची परंपरा इंदिरा गांधींनी सुरू ठेवली. त्यांनी आणिबाणी लावली. राजीव गांधींनी घटना दुरुस्ती केली, असे मोदी म्हणाले. काँग्रेसच्या एका नेत्याने युपीए सरकारच्या काळात कॅबिनेटचा निर्णय फाडला होता, अशी टीका त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली. काँग्रेसने 60 वर्षांत 75 वेळा घटनादुरुस्ती केली, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींना चक्क ‘विविधतेत एकता’ची आठवण झाली. आपले संविधान हे देशाच्या एकात्मतेचा आधार आहे. विविधतेत एकता हे देशाचे वैशिष्ट्ये आहे. आपले सरकार त्याच दृष्टीने काम करत असून, ‘सबका साथ सबका विकास’ हे आपले धोरण असल्याचे मोदी म्हणाले.