ट्रम्प यांच्या डोक्यात विकासाचा स्पष्ट रोडमॅप, नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा

फोटो- रॉयटर्स

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी आज मोदी यांची तीन तासांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धाडसी व्यक्तिमत्त्व असल्याचे मोदी म्हणाले. ट्रम्प हे धाडसी असून ते त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आधीच्या तुलनेत अधिक तयार दिसले. त्यांच्या डोक्यात विकासाचा स्पष्ट रोडमॅप आहे. प्रत्येक रोडमॅप त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी मजबूत आणि सक्षम अशी टीम बनवली आहे, असे मोदी म्हणाले.

मोदी यांनी मुलाखतीत आरएसएस, पाकिस्तान, चीन, ट्रम्प, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण, क्रीडा, राजकारण आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मोदी यांनी अनेकदा एकांतवासात जाऊन ध्यानधारणा केली आहे. याबद्दल विचारले असता ध्यान हा शब्द खूप जड झाला आहे. मी लोकांना समजावून सांगतो की याचा अर्थ केवळ स्वतःला विचलित होण्यापासून मुक्त करणे आहे.

गुजरात दंगलीबद्दल विचारले असता गुजरात दंगलीच्या चर्चेतून खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक दंगली झाल्या, वारंवार जातीय हिंसाचार होत होता.1999 मध्ये कंदहार विमान अपहरण घडले. 2000 मध्ये लाल किल्ल्यावर आणि 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला. परंतु, 2002 नंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल घडलेली नाही. आता राज्यात कायमस्वरूपी शांतता आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान गुढीपाडव्याला आरएसएसच्या कार्यालयात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदाचे शताब्दी वर्ष असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्च रोजी रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. ही भेट फार महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान झाल्याच्या अकरा वर्षांत त्यांनी नागपुरातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. दीक्षाभूमीलाही भेट दिली, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ते कधीच गेले नव्हते.