पंतप्रधान, अनुराग ठाकूर लोकसभेत सपशेल खोटे बोलले; काँग्रेसची लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार

लोकसभेतील भाषणात तद्दन खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनुराग ठाकूर यांचा खोटारडेपणा काँग्रेसने आज एका पत्राद्वारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निदर्शनास आणला आहे.

काँग्रेसने निवडणूक प्रचारात दिलेले आश्वासन, 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे आणि पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतली नसल्याविषयीच्या कथित दाव्यांकडे ओम बिर्ला यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि अनुराग ठाकूर यांनी 18 व्या लोकसभेच्या अधिवेशनात केलेल्या चुकीच्या विधानांचा तपशील पत्रात देण्यात आला आहे.

काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी बिर्ला यांना हे पत्र लिहिले आहे. या प्रकरणी निर्देश 115(1) च्या तरतुदी लागू केल्या जाव्यात आणि आवश्यक कार्यवाही सुरू केली जाऊन या संदर्भात योग्य ती कृती केली जावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. निर्देश 115(1) तील तरतुदींनुसार, कोणत्याही खासदाराच्या वक्तव्यांतील चुकीची बाब अधोरेखित करू पाहाणाऱया खासदाराला संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी अध्यक्षांना पत्र लिहावे लागते.

काँग्रेसच्या काळात लष्करासाठी बुलेटप्रूफ जॅकेट दिली गेली नाहीत हा पंतप्रधानांचा दावाही असाच “घोर दिशाभूल करणारा’’ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. “जॅकेट नव्हतीच असे नाही तर, जॅकेट्सचा तुटवडा होता. मुंबई हल्ल्याच्या वेळी तर पोलिसांकडेही बुलेटप्रूफ जॅकेट होती, असे या पत्रात नमूद केले आहे.

– काँग्रेसने लष्कराला लढाऊ विमाने दिली नाहीत, हे मोदींचे विधानही दिशाभूल करणारे आहे. काँग्रेसच्या काळात मिग 29, जग्वार, मिराज 2000 आणि सुखोई एसयू 30 विमाने लष्कराकडे होती, याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.

मोदींनी केलेले चुकीचे दावे
काँग्रेसने महिलांना दरमहा 8,500 रुपये देण्याचे खोटे वचन दिले, असा चुकीचा दावा पंतप्रधानांनी मंगळवारी लोकसभेत केलेल्या भाषणात केला, असा आरोप विरुधुनगरचे खासदार टागोर यांनी केला. विजय मिळवून सरकार स्थापनेनंतर पूर्ण करण्याचे हे वचन होते, असे त्यांनी म्हटले आहे. एकटय़ाने लढलेल्या 16 राज्यांमध्ये काँग्रेसचे मताधिक्य कमी झाले आहे, हा मोदींचा दावाही चुकीचा आहे. वास्तविक हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ठाकूर यांचा खोटेपणाही आणला समोर
काँग्रेसची सत्ता असताना लष्कराला शस्रास्रे आणि लढाऊ विमाने देण्यात आली नाहीत, असा दावा लोकसभेत खा. अनुराग ठाकूर यांनी 1 जुलै रोजी केला होता. पण त्या वेळी आपल्याकडे जग्वार, मिग 29, एसयू-30, मिराज 2000 होती. आपल्याकडे अण्वस्त्रs, अग्नि, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल आणि नंतर ब्रह्मोस सारखी क्षेपणास्त्र होती, असे सांगत काँग्रेसने ठाकूर यांचाही खोटेपणा उघड केला आहे.

– 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले हा ठाकूर यांचा दावाही असाच वास्तवापासून फारकत घेणारा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. पंतप्रधानांनी एकही सुट्टी घेतलेली नाही, असे ठाकूर म्हणतात मग, निवडणूक प्रचारासाठी कोणत्या प्रकारची सुट्टी घेतली जाते, असा प्रतिप्रश्न काँग्रेसने विचारला आहे.