राहुल गांधी यांच्या हल्ल्यानंतर हडबडलेल्या मोदींची जुनीच टेप… पुन्हा हिंदू खतरे में…पुन्हा आणीबाणी… तेच ते आणि तेच ते

आम्ही तुष्टीकरण नाही तर संतुष्टीकरण करतो. आम्ही खरी धर्मनिरपेक्षता देशाला दाखवली आहे. आमच्या निष्ठेवर आणि विकासासाठी देशातील जनतेने विश्वास दाखवला आहे. आम्हाला जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे.

भगवान शिव, अभय मुद्रा, इस्लाम आणि ‘अग्निवीर’वरून सत्ताधारी भाजपची सालटी काढत, ‘‘हिंदू म्हणजे फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही,’’ असा जोरदार हल्ला करणाऱ्या राहुल गांधींना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देताना अक्षरशः जुनीची टेप लावली. काँग्रेसने सत्तेसाठी तुष्टीकरण केले. त्यांच्या काळात दहशतवादी हल्ले व्हायचे, घोटाळे व्हायचे, हिंदू खतरे में होता. काँग्रेसने आणीबाणी लावली, असे सांगत 2014नंतर आम्ही शत्रूला घरात घुसून मारू लागलो, अशी शेखी मिरवली. 1984नंतर काँग्रेसने 200पेक्षा जास्त जागा जिंकल्या नसल्याचे सांगत अपयशाचे रेकॉर्ड बनवले, असेही मोदी म्हणाले. राहुल गांधी यांचे तीर भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागल्यामुळे हडबडलेल्या मोदींनी आज लोकसभेत भाषण करताना आदळआपट केल्याचे यामुळे स्पष्ट झाले.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी यांना टार्गेट केले. मोदींनी भाषण करताना याआधी मांडलेले मुद्देच नव्याने मांडल्याने विरोधकांनी चांगलाच हंगामा करीत घोषणाबाजी केली. त्यामुळे मोदींना तब्बल दोन वेळा आपले भाषण थांबवावे लागले. विकसित भारतासाठी जनतेने आम्हाला जनादेश दिल्याचे ते म्हणाले. 2014पर्यंतचा कालावधी देशासाठी निराशाजन होता. याच काळात दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. घोटाळ्यांनी हात काळे झाले होते. मात्र आम्ही सर्जिकल स्ट्राइक करून शत्रूला घरात घुसून मारले. याआधी बँकिंग क्षेत्र खासगी संपत्ती समजून लुटण्याचे प्रकार चालायचे. मात्र आम्ही बँकांना मजबूत केले.

आम्ही तुष्टीकरण नाही संतुष्टीकरण मानतो

भारताच्या संविधानावर विश्वास टाकत आणि भारताच्या तिरंग्यावर विश्वास टाकत लोकांनी मतदान केले. 140 कोटी देशवासियांमध्ये विश्वास निर्माण झाला. आम्ही तुष्टीकरण नाही तर संतुष्टीकरण करतो. आम्ही खरी धर्मनिरपेक्षता देशाला दाखवली आहे. आमच्या निष्ठेवर आणि विकासासाठी देशातील जनतेने विश्वास दाखवला आहे. आम्हाला जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे, असेही मोदी म्हणाले.

सभापती-विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

विरोधकांनी मोदींच्या वक्तव्यांवर वारंवार आक्षेप घेत जोरदार निषेध केला. या वेळी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचे विकासाचे दावे खोटे असल्याचे सांगण्यात येत हाते. या वेळी झालेल्या प्रचंड गोंधळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र विरोधकांनी याकडे दुर्लक्ष करीत सरकारच्या निषेधाची घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने सभापती विरोधकांवर भडकले. या वेळी सभापती आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.