नांगरबहाद्दर पुजारा ऑस्ट्रेलियात खेळू शकतो; रॉबिन उथप्पाचा विश्वास

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खराब शॉट निवडल्यामुळे आणि आक्रमक फलंदाजीमुळे हिंदुस्थानच्या फलंदाजांनी माती खाल्ली. मात्र आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर हिंदुस्थानला बचावात्मक खेळी करणाऱ्या खेळाडूची नितांत गरज आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या संघात अद्यापी नांगरबहाद्दर चेतेश्वर पुजाराला जागा मिळू शकते, असा विश्वास हिंदुस्थानचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने व्यक्त केला आहे.

हिंदुस्थानचा संघ वर्षातील सर्वात मोठ्या लढतीसाठी सज्ज होत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हिंदुस्थान 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून या मालिकेचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या खराब प्रदर्शनानंतर हिंदुस्थानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये आपले स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या नवोदित फलंदाजांनी केलेला वेगवान आणि आक्रमक खेळ हा हिंदुस्थानचा कर्दनकाळ ठरला. यावर उथप्पा म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक दौऱयात पारंपरिक शैलीतील क्रिकेट खेळू शकणाऱया केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांच्यासारख्या एखाद्या फलंदाजाची हिंदुस्थानला गरज भासेल. सध्या हिंदुस्थानाच्या संघात असलेले युवा खेळाडू पारंपरिक पद्धतीने खेळण्याऐवजी जलदगतीने धावा करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पारंपरिक खेळी करणारा खेळाडूची गरज भासणार आहे. ही रिक्त जागा चेतेश्वर पुजारा चांगल्या पद्धतीने भरून काढू शकतो.

पुजाराने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. खरे सांगायचे झाले तर पुजारासारख्या खेळाडूला कसोटी संघात स्थान मिळावे असे मला अजूनही वाटते, असेही उथप्पा म्हणाला.