अतिशय दुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना थांबण्याचे नावच घेत नाहीत. मूलभूत सुविधांअभावी येथील नागरिकांना हाल होत आहेत. नंदुरबारमधून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गावात रस्ता नसल्याने गर्भवती महिलेची घरीच प्रसुती करावी लागली. पण बाळाचा जन्मतःच मृत्यू झाला. यानंतर आईची प्रकृती खालावल्याने तिला बांबूच्या झोळीतून 15 किमी जीवघेणा प्रवास करावा लागला.
तोरणमाळजवळ असलेल्या केलापाणी गावात रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेची घरीच प्रसुती करण्यात आली. मात्र प्रसुतीदरम्यान बालकाचा मृत्यू झाला तर आईची तब्येत खालावली. यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी जंगल मार्गाने तब्बल 15 किमी प्रवास करावा लागला. बांबूच्या झोळीत महिलेला टाकून नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सुमारे पाच तास पायपीट करत तोरणमाळ आरोग्य केंद्रात नेले.
केलपाणी ते कालापाणी या दोन गावात 15 किमी अंतर आहे. मात्र केवळ 5 किमीचा रस्ता मंजूर झाला असून गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूमिपूजन करून एक वर्ष उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.