लातूरमधील वलांडी-भालकी रोडवरील बाजारपेठेत टवाणी कॉम्पलेक्सला सोमवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास बाजारपेठेत कुणी नव्हते. आगीचे लोळ उठू लागल्यानंतर आग लागल्याचे समजले. या आगीत पाच दुकाने जळून खाक झाली. यात घटनेत सुमारे 50 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेदिवशी वेळाआमश्या असल्याने कोणीही सकाळी दुकान ऊघडले नव्हते. आदल्या दिवशी सर्व दुकान मालक आपली दुकाने बंद करून आपल्या गावी गेले होते. सर्व दुकाने पत्र्याच्या शेडची आहेत.
दुकाने बंद असल्याने आगीबाबत तात्काळ माहिती मिळू शकली नाही. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धुराचे लोट पाहिल्यानंतर याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. यानंतर गावकरी आणि बाजारपेठेतील व्यापारी यांनी पोलीस आणि अग्नीशमन दलाला याबाबत माहिती दिली.
आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. वाऱ्याचा वेग, आगीचे रौद्ररूप आणि झालेला विलंब यामुळे अनेक दुकाने आगीत जळून भस्म झाली आहेत.
देवणी तहसीलचे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, पोलीस निरीक्षक माणिक डोके, माजी सरपंच राम भंडारे आणि व्यापारी कमिटीचे अध्यक्ष ऊमाकांत नागलगावे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.