चिखलीकरांच्या समर्थकांचा ‘प्रताप’… फेसबुकवर विरोधात पोस्ट लिहिली, भाजपच्या भाडोत्री गुंडांचा शिवसैनिकावर निर्घृण खुनी हल्ला

फेसबुकवर विरोधात पोस्ट लिहिली म्हणून भाजपच्या भाडोत्री गुंडांनी शिवसैनिक संतोष वडवळे यांच्यावर निर्घृण खुनी हल्ला केला. या हल्ल्यात वडवळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर हे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे समर्थक असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदेड मधील कंधार येथील तालुका उपप्रमुख संतोष वडवळे यांनी शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर टीका करण्यात आली होती. वडवळे यांच्या पोस्टमधील टीका झोंबल्याने भाजप कार्यकर्त्यांनी वडवळे यांचा शोध सुरू केला.

संतोष वडवळे हे मंगळवारी रात्री नांदेडहून मोटारसायकलवर त्यांच्या कापसी या गावाकडे निघाले असता भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रस्त्यातच गाठले. डोळ्याला पट्टी बांधून त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आणि तिथे वडवळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यानंतर गंभीर अवस्थेत वडवळे यांना अण्णाभाऊ साठे चौकात सोडून भाजपचे हे गुंड कार्यकर्ते पसार झाले. वडवळे हे स्वत:च निर्मल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. परंतु त्रास वाढल्याने त्यांना यशोसाई या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवसैनिकांची गर्दी

भाजप कार्यकर्त्यांनी शिवसैनिकावर खुनी हल्ला केल्याची माहिती कळताच शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार, उपजिल्हाप्रमुख संजय ढेपे, शहरप्रमुख संजय कोडगिरे आदींसह शेकडो शिवसैनिक हॉस्पिटलसमोर गोळा झाले. पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांना घटनेची माहिती देण्यात आली. शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

दिवसभर पोलीस जबाबच घेत होते…

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा ताफा यशोसाई हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. जबाब नोंदवल्याशिवाय तक्रार घेता येणार नाही, असे म्हणत पोलीस दिवसभर संतोष वडवळे यांचा जबाबच नोंदवत होते. पोलीस दिवसभर जबाब घेण्यात मग्न असल्याने भाजपचे हल्लेखोर कार्यकर्ते खुलेआम नांदेडात फिरत होते.