भाजपमधला कलह संपेना, तू तू मै मै सुरूच; विखे पाटलांच्या उपस्थित कार्यकर्त्यांची चकमक

नांदेड लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाले. यानंतर नांदेडची जागा मोठय़ा मताधिक्याने जिंकणार असल्याची भीमगर्जना करण्यात आली, मात्र, माशी कुठे शिंकली कळायला मार्ग निघेना. यामुळे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेडात मंथन बैठक घेत अशोक चव्हाणांची पाठराखण केली. त्यानंतर आज मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आयोजित बैठकीत भाजपमधील कलह समोर आला. बैठकीपूर्वीच तू तू मै मै होत कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

बैठक सुरू होण्यापूर्वीच केवळ बारा-बारा कार्यकर्त्यांनाच बोलविल्याने संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी निमंत्रणे देणाऱया मंडळींशी हुज्जत घालून राडा केला. हा गोंधळ जवळपास पंधरा मिनिटे सुरू होता. स्वागत झाल्यानंतर आमदार व माजी खासदारांची त्यांनी आपल्या विश्रामगृहातील कक्षात बैठकीबाबत चर्चा केली. विधानसभानिहाय बैठकांना बसावे, उर्वरित विधानसभेच्या पदाधिकाऱयांनी त्यांच्या वेळेनुसार बैठकीला यावे, अशा सूचना करण्यात आल्या. बिलोली, देगलूर व नायगाव विधानसभा मतदारसंघांतील अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱयांनी पक्षासाठी काम केले. फक्त मिरविण्यासाठी काही पदाधिकाऱयांनी पुढे पुढे केले. त्यामुळे सर्व पदाधिकाऱयांना बैठकीत बसू द्या, या बारा जणांची निवड कुणी केली, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.