किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवित असलेले गोविंद जेठेवार यांनी आज सकाळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद सांबन्ना जेठेवार यांनी देखील अर्ज दाखल केला होता. काही दिवसापासून ते तणावात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज सकाळी गोविंद सांबन्ना जेठेवार यांनी विषारी औषध प्राशन केले आणि त्यात ते बेशुध्द झाले. परिसरातील नागरिकांनी लगेच त्यांना गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे. त्यांनी नेमक्या कुठल्या कारणामुळे आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत असून, अद्याप तरी कारण समजू शकले नाही. किनवट विधानसभा मतदारसंघात २९ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी बारा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता तेथे १७ उमेदवार रिंगणात असून, त्यात जेठेवाड यांचाही समावेश आहे.