Nanded News – नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अर्धापूर तालुक्यात हळहळ

अतिवृष्टी, शेतातील सततची नापिकी यामुळे कर्जबाजारी झालेल्या अर्धापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश महाजन आणि अर्धापूर शहरातील नारायण राऊत अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालूक्यातील बारसगाव येथील शेतकरी गणेश नामदेव महाजन (वय 44) यांची बारसगाव शिवारात शेती असून त्यांनी आपल्या शेतीवर बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील सततची नापिकी यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडणार? त्यातच कुंटुबाचा उदरनिर्वाह कसा चालवणार? हे प्रश्न त्यांना सतावत होते. नैराश्यात येऊन त्यांनी आपल्या शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. सदर माहिती कळतात नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे अर्धापूर शहरातील गणपतराव देशमुख नगर येथील नारायण गोविंदराव राऊत झाडगावकर (वय 50) यांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.