Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त

सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणार्‍यांविरोधात धर्माबाद पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. सट्टेबाजीप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे धर्माबाद शहर आणि तालुक्यात आयपीएलवर सट्टा खेळणार्‍याचे धाबे दणाणले आहेत.

धर्माबाद शहरात क्रिकेटच्या विविध संघाच्या सामन्यांद्वारे अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून लोटस औरासारख्या लिंक्ड अ‍ॅप्सचा आधार घेत सट्टेबाजी करत आहेत. धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 एप्रिल रोजी रात्री 9.45 च्या सुमारास पोस्ट ऑफिसच्या बाजूला असणार्‍या साई बिर्याणी हॉउसच्या समोर आरोपी साईनाथ लक्ष्मण पवार (31) सट्टा खेळताना पोलिसांच्या हाती लागला.

साईनाथने सदरची आयडी ही राजू गोणारे याच्याकडून घेतली असल्याचे पोलिसांना सांगितले. सध्या राजू गोणारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. साईनाथ पवारकडून 10 हजार किंमतीचा मोबाईल आणि नगदी 2500 रुपये असा 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसर्‍या एका घटनेत 3 एप्रिल रोजी रात्री 9.40 च्या सुमारास आंध्र बसस्टॅन्ड येथे आरोपी अंकुश नारायणसिंह चव्हाण (27) हा देखील सट्टेबाजी करताना आढळून आला. आयपीएलच्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट राईडर्स ह्या सामन्यावर अँड्रॉइड मोबाईलद्वारे सट्टेबाजी करीत असताना अंकुश पोलिसांच्या हाती लागला. सदरची आयडी ही त्याने सोनू ठाकूर नामक व्यक्तीकडून घेतली असल्याचे समजते आहे. सध्या सोनू ठाकूर हा फरार असून पोलीस त्याचा शोध आहेत.

अंकुशकडून 15 हजार किंमतीचा मोबाईल आणि नगदी 2 हजार रुपये असे मिळून 17 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. दोन्ही प्रकरणात धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दोन्ही घटनेतून धर्माबाद हे आयपीएलसह विविध सामन्यांचे सट्टेबाजी करणार्‍यावर धर्माबाद पोलिसांची करडी नजर असल्याचे दिसून येत आहे.