नांदेडहून बुधवारी रात्री निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेस मनमाड ते नाशिक दरम्यान आल्यानंतर काही चोरट्यांनी या रेल्वेमध्ये धुमाकूळ घातला. त्यात काही जण किरकोळ जखमी झाले. चोरट्यांनी अनेकांना लुबाडल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी आक्रमक होत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रवाशांच्या हातून निसटून पळून गेला.
बुधवारी रात्री नांदेड रेल्वेस्थानकावरुन राज्यराणी एक्सप्रेस निघाली. ती आज पहाटेच्या दरम्यान मनमाड ते नाशिक दरम्यान पोहोचली. पहाटेच्या झोपेच्या फायदा घेत मनमाड ते नाशिक दरम्यान काही चोरट्यांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडले. याचा अनेकांना फटका बसला. यानंतर या चोरट्यांचा पाठलाग केला मात्र तो निसटून गेला. या घटनेमुळे राज्यराणी एक्सप्रेस खैरवाडी स्थानकावर थांबविण्यात आली. तेथे प्रवाशांनी काहीकाळ रेलरोको आंदोलनही केले. मिळालेल्या माहितीनुसार या चोरट्यांनी अनेक प्रवाशांना धमकावून त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडण्यात येत होते. यावेळी काही प्रवाशांनी विरोध केला तेंव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. यात विशाल शंकर कांबळे हा नांदेड जिल्ह्याचा प्रवाशी तसेच अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
काही प्रवाशांनी खैरवाडी स्थानकावर चैन ओढून रेल्वे थांबवली. त्यावेळी रेल्वे पोलीस सदरच्या डब्यात आले. रेल्वेच्या डब्यात धुमाकूळ घालणार्या चोरट्यांना पकडण्यासाठी खैरवाडी स्थानकाजवळ रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक एक ते दोन तास विस्कळीत झाली. त्याचा परिणाम पंचवटी एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस व अनेक गाड्यांवर झाला. राज्यराणी एक्सप्रेस तब्बल दोन तास उशिरा धावली. मुंबईमध्ये आज मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे, तसेच काही जण महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी येथे जाण्यासाठी निघाले होते. याचा फटका या प्रवाशांना बसला. तब्बल दोन तासांनी उशिरा ही रेल्वे आज सकाळी मुंबई येथे पोहोचली. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला असून, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे सांगून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर व सुरक्षेवर संताप व्यक्त केला. सकाळी दहा वाजता मुंबईत पोहोचणारी राज्यराणी एक्सप्रेस या सर्व प्रकारामुळे आज दुपारी 1.40 वाजता मुंबई येथे पोहोचली. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधला असता सदरची घटना चोरीचा प्रकार नसून अन्य कारणामुळे प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले. त्यामुळे अशा गंभीर प्रकारावर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून पांघरुन घालण्याचा प्रयत्न होत आहे.