Nanded News – नांदेडमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी

नांदेड-बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी भव्य मुक्ती आंदोलन महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी झाले होते. बौद्ध भिक्खू समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते. मंगळवारी दुपारी एक वाजता आंदोलन सुरु करण्यात आले.

नांदेड येथील मोर्चासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी सुरु होती. यासाठी बौद्ध भिक्खू महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी परिश्रम घेत होते. बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ आहे. महाबोधी महाविहार जगाला शांतीचा संदेश आणि समतेचा उपदेश देणार्‍या तथागत भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे पवित्र ठिकाण आहे. भारतीयच नव्हे तर जगाच्या पाठीवर असणार्‍या समस्त बौद्ध अनुयायांसाठी महाबोधी महाविहार हे श्रध्देचे स्थळ आहे.

महाबोधी महाविहार येथे अन्य मंडळींचा ताबा असल्याने भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना हरताळ फासण्यात येत आहे. या संदर्भातील मंदिर कायदा 1949 हा तात्काळ रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला. नवामोंढा मैदान भागातून दुपारी एक वाजता हा मोर्चा निघाला. महात्मा फुले पुतळा, शिवाजीनगर, वजिराबाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अनुयायी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि बौद्ध बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर बौद्ध भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच अन्य संघटनाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून या मोर्चाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. तात्काळ याची नोंद प्रशासनाने घेवून संबंधितांना नांदेड जिल्ह्यातील बौद्ध बांधवांच्या भावना कळवाव्यात, अशी विनंती यावेळी करण्यात आली.