गंजगाव वाळू डेपोवरून वाळू वाहतुकीचा हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोणतीही कारवाई न करता चालू देण्यासाठी 17 हजारांची लाच घेताना कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकार्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आहे.
तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदाराकडे एक हायवा असून ते गंजगाव वाळू डेपोवरून कायदेशीर परवानगी असलेल्या ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतात. वाळू वाहतुकीचा हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाताना त्यावर कोणतीही पोलीस कारवाई करण्यात येऊ नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत त्यांनी नांदेड येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर 23 जानेवारी रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यातच सापळा रचण्यात आला होता. यात 25 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती व तडजोडी 17 हजार रुपये पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या समक्ष स्वीकारले.
आरोपी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभाग नांदेडचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोलीस कर्मचारी राजेश राठोड, बालाजी मेकाले, ईश्वर जाधव आदींनी केली आहे.