Nanded News – अवैध रेती उपसा करणाऱ्यांना नांदेड पोलिसांचा दणका, एक कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध रेती उपसा करणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी घाटाच्या परिसरात नांदेड पोलिसांनी जबरदस्त कामगिरी करत एक कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अवैध रेती उपसा तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार कामगिरी सुरू आहे. काल रात्री व आज (16 फेब्रुवारी 2025) सकाळी लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी घाट परिसरातील एका शेतशिवारात तसेच गोदावरी नदीत अबिनाशकुमार यांच्या संयुक्त पथकाने जबरदस्त कारवाई करत आठ लोखंडी बोटी, सहा इंजन, एक जेसीबी, 25 ब्रास रेती असा एक कोटी 43 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी नवनाथ मोरे यांच्याविरुध्द कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांना मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत गोपनियरित्या नांदेडच्या पोलिसांनी हि कामगिरी केली आहे. या कामगिरीत पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपपोलीस उपअधीक्षक अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आले. त्यानुसार या पथकाने ही कारवाई केली आहे. यातील आरोपी पोलिसांना पाहून पळून गेल्याचे पोलिसांनी कळविले आहे. अवैध रेती उपसा व वाळू घाटावर अवैधरित्या रेतीची साठवणूक याविरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास दहा कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.