Nanded News – नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार, पॅरोलवर सुटलेल्या आरोपीसह दोघांवर हल्ला; एकाचा मृत्यू

<<< विजय जोशी >>>

नांदेड शहरात गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. सोमवारी सकाळी आणखी गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले आहे. पॅरोलवर सुटलेल्या आरोपीसह दोघांवर गोळीबार करण्यात आला. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविंद्रसिंघ दयासिंघ राठोड असे मयताचे नाव आहे. तर गुरमितसिंघ जगिंदरसिंघ सेवादार असे जखमी आरोपीचे नाव आहे.

गुरमितसिंघ जगिंदरसिंघ सेवादार हा कुख्यात आरोपी रिंदाचा भाऊ सतेंद्रसिंघ उर्फ सत्या याला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सतेंद्रसिंघ उर्फ सत्या हा बबर खालसा या अतिरेकी संघटनेच्या सदस्य असलेल्या हरविंदसिंघ उर्फ रिंदाचा भाऊ होता. या हत्येप्रकरणी सहा ते आठ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र गुरमितसिंघला जन्मठेपेची शिक्षा झाली.

गुरमितसिंघ सध्या पॅरोलवर बाहेर आला आहे. सोमवारी सकाळी गुरमितसिंघ आणि त्याचा मित्र रविंद्रसिंघ दोघे कारने जात असताना गुरुद्वारा गेटजवळील वाहन तळावजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर 10 राऊंड फायर केले. यात दोघेही जखमी झाले. दोघांना उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविंद्रसिंघ याचा मृत्यू झाला.

गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकीवर पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम आदीसह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. हल्लेखोरांच्या अटकेसाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली असून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.