
नांदेड जिल्ह्यातील आसेगाव शिवारामध्ये शुक्रवारी सकाळी हळद काढणीसाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातामध्ये 8 महिलांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये 10 ते 12 जण होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला आणि एक पुरुष नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात असणाऱ्या दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. या सर्व महिला ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून मजुरीसाठी निघाल्या होत्या. आलेगाव शिवारात दोन शेतामध्ये असलेल्या चारीमधून ट्रॅक्टर घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर शेतातील विहिरीमध्ये कोसळला. या अपघातामध्ये 8 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर एक पुरुष आणि दोन महिला विहिरीतून कशाबशा बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला आहे. दरम्यान, ट्र्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
अपघाताची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्यातील निमगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच वसमतच्या तहसीलदा शारदा दळवी, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे गजानन बोराटे, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, गुंजचे पोलीस पाटील अंकुश सूर्यवंशी यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ट्रॅक्टरसह ट्रॉलीही बुडाली आहे. सध्या क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉलीसह मृतदेह बाहेर काढण्याचे पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
ताराबाई सटवाजी जाधव (वय – 35), ध्रुपता सटवाजी जाधव (वय – 18), सरस्वती लखन बुरड (वय – 25), सिमरन संतोष कांबळे (वय – 18), चउत्राबाई माधव पारधे (वय – 45), ज्योती इरबाजी सरोदे (वय – 35) सपना तुकाराम राऊत (वय – 25) अशी मृतांची नावे आहेत. तर पार्वतीबाई बुरड (वय – 35), पुरभाबाई कांबळे (वय – 40) आणि सटवाजी जाधव (वय – 55) अशी या अपघातातून वाचलेल्यांची नावे आहेत.