
हळद काढण्यासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने विहिरीत कोसळला. नांदेड जिल्हय़ातील आलेगाव येथे ही घटना घडली. या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला असून तीन जणांना वाचवण्यात यश आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
हिंगोली जिल्हय़ातील वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 जण आलेगाव शिवारातील दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात हळद काढण्यासाठी सकाळीच ट्रक्टरने निघाले होते. आलेगाव शिवार येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ट्रक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या 70 फूट खोल विहिरीत कोसळला. ट्रक्टर विहिरीकडे जात असताना चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्रेनद्वारे विहिरीत उतरून शोधकार्य सुरू केले होते. सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेले शोधकार्य दुपारी तीन वाजेपर्यंत चालले.
ताराबाई जाधव (35), धुपता जाधव (18), सरस्वती बुरड (25), सिमरन कांबळे (18), चतुराबाई पारधे (45), ज्योती सरोदे (35), सपना राऊत (25) यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर पार्वतीबाई बुरूड (35), पुरभाबाई कांबळे (40) व सटवाजी जाधव (55) या तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यास यश आले.