नांदेड शहरात 2006 साली पाटबंधारे नगरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची नांदेड न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात 49 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सदर स्फोट हा बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. हा बॉम्बस्फोट नसल्याचा निर्वाळा देत न्या. सी. व्ही. मराठे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण?
नांदेड शहरात 6 एप्रिल 2006 रोजी पाटबंधारे नगरात राजकोंडवार यांच्या घरी स्फोट झाला होता. सुरुवातीला हा स्फोट फटाक्याचा असल्याचे मानले जात होते. मात्र तत्कालीन पोलिसांनी याचा सखोल तपास केला. सर्व बाजूने सूक्ष्म तपासणी केल्यानंतर पोलिसांनी याबाबत वेगवेगळी माहिती हस्तगत केली. यात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे या दोघांचा मृत्यू झाला होता. तर मारोती वाघ, योगेश देशपांडे, गुरुराज टोपटीवार आणि राहुल पांडे हे गंभीर जखमी झाले होते.
तपासादरम्यान पूर्णा, परभणी, जालना येथेही झालेल्या बॉम्बस्फोटाशी याचा काही संबंध आहे का? याचाही तपास पोलीस करीत होते. यानंतर हे प्रकरण नांदेड पोलिसांनी सीबीआयकडे सोपवले. सीबीआयने याबाबत सखोल तपास करून दोन हजार पानांची चार्जशिट न्यायालयाल दाखल केली.
जिल्हा सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती सी. व्ही. मराठे यांच्याकडे हे प्रकरण होते. या खटल्यात 49 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र त्यात सीबीआय पाटबंधारे नगर भागातील स्फोट हा बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. अन्य कोण्या बाबीमुळे तेथे स्फोट झाला असावा हे ग्राह्य धरुन न्यायालयाने राहुल पांडे, संजय चौधरी, रामदास मुलंगे, मारोती वाघ, योगेश रविंद्र देशपांडे, गुरुराज तुप्तेवार, मिलिंद एकताटे, मंगेश पांडे, राहुल धावडे आणि जखमीवर उपचाराची माहिती न दिल्याने डॉ.उमेश देशपांडे या सर्वांना आरोपी करण्यात आले होते.
सदरच्या खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने अॅड.नितीन रुणवाल यांनी बाजू मांडली होती. सदरच्या बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जातीय तणाव देखील निर्माण झाला होता. त्याठिकाणी बॉम्ब निर्माण करण्यात येत होते काय, असे तर्कवितर्क देखील वर्तविण्यात येत होते. तब्बल अठरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल आज लागला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.