Nanded News : मरावे परी कीर्तिरुपे उरावे! अभिजित डोके यांच्यामुळे 8 जणांना जीवदान

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहायक व्यवस्थापक अभिजित ढोके यांचा चार दिवसांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा काल (2 जुलै) रोजी ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अभिजित यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज (3 जुलै 2024) दुपारी चार वाजता त्यांचे अवयव ग्लोबल हॉस्पिटल येथून ग्रीन कॉरिडॉर करून कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मोकाकळी शाखेचे सहायक व्यवस्थापक अभिजित ढोके यांचा चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर ते मागील चार दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. अखेर त्यांची मृत्यूशी झूंज संपली आणि आज (3 जुलै) ब्रेडेडने त्यांचा मृत्यू झाला. दु:खाचा डोंगर कोसळला असताना सुद्धा कुटुंबीयांनी सामाजीक भान ठेवत अभिजित यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ.त्र्यंबक दापकेकर यांनी ग्लोबल हॉस्पिटल येथे त्यांच्या कुटुंबीयांच्या संमती पत्रकावर सही घेतली. त्यानंतर अभिजित यांचे ह्रदय, यकृत, दोन्ही किडन्या, डोळे, फुफ्फुसे काढूण घेण्यात आली. काढूण घेण्यात आलेले अवयव बजाज हॉस्पिटल येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकऱ्यांची परवानगी घेण्यात आली. त्यानुसार सायंकाळी चार वाजता आयटीआयच्या ग्लोबल हॉस्पिटल ते नांदेड विमानतळ या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर घेण्यात आला.

अवयवदानामुळे आठ जणांना जीवदान मिळणार आहे. आठ जणांपैकी दोघांना दृष्टी मिळणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नांदेड शहरातील हा सहावा ग्रीन कॉरिडॉर यशस्वी झाला. तसेच पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी चांगले सहकार्य केल्याचे डॉ. त्र्यंबक दापकेकर यांनी सांगितले.