Nanded Lok Sabha Bypoll : नांदेड लोकसभा मतदारसंघात रविंद्र चव्हाण यांच्या बाजूने जनतेचा कल

लोकसभेवर नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार वसंतराव चव्हाण यांचे अवघ्या तीन महिन्यातच निधन झाल्याने नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत असून, पाडापाडीच्या राजकारणात वसंतराव यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांच्या बाजूने जनतेचा कल दिसून येत आहे. त्यांच्या समोर भाजपाचे संतुकराव हंबर्डे व वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांच्यातील तिरंगी लढत होत आहे. एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला. माजी खासदार भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव करत चव्हाणांनी भाजपाला धोबीपछाड केले. मात्र त्यांची प्रकृती खालावली. हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानंतर आता नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव व मुखेड या मतदारसंघात वसंतराव चव्हाणांना मताधिक्क्य मिळाले होते. तर अशोक चव्हाणांचे प्राबल्य असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपाला केवळ 4 हजार 500 मतांचे मताधिक्क्य मिळाले होते. नांदेड शहरात दोन मतदारसंघात मिळून 40 हजाराचे मताधिक्क्य महाविकास आघाडीला मिळाले होते. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांना व डॉ.अजित गोपछडे यांना राज्यसभेची लॉटरी लागली. त्यामुळे जिल्ह्यात पाच आमदार व दोन राज्यसभा खासदार असताना हि निवडणूक आपण सहज जिंकू, असे चिखलीकरांना वाटत होते. मात्र मतदारांना चव्हाणांचा अचानक झालेला भाजपा प्रवेश आवडला नाही. त्यातच मराठा आंदोलनाचा मोठा फटका या निवडणुकीत भाजपाला बसला. महाविकास आघाडीच्या एकजुटीच्या प्रचाराने वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला. मात्र त्यांचे केवळ साडेतीन महिन्यातच निधन झाले.

लोकसभेच्या नांदेडच्या पोटनिवडणुकीत येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा.रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले. भारतीय जनता पक्षातर्फे कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष असतानाच अशोक चव्हाणांनी लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितल्यानंतर ग्रामीणचे भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीतर्फे अविनाश भोसीकर यांच्यासह एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अकाली निधन झालेले वसंतराव चव्हाण हे पाचवे लोकप्रतिनिधी आहेत. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवटचे माजी आमदार सुभाष जाधव, नांदेडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश खेडकर, मुखेड विधानसभेवर निवडून गेलेले गोविंदराव राठोड तसेच बिलोलीचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा त्यात समावेश आहे. आमदार प्रकाश खेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती अनुसया खेडकर या विजयी झाल्या. गोविंदराव राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र डॉ.तुषार राठोड तर रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर जितेश अंतापूरकर हे पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. अशी जिल्ह्याची पार्श्वभूमी आहे.