Nanded crime news – गुरुद्वार गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, नांदेड पोलिसांची कारवाई

नांदेडमधील गुरुद्वार येथे 10 फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबार प्रकरणात नांदेड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांनीही हल्लेखोराला मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता नांदेडच्या गुरुद्वारा गेट क्र. 6 परिसरात पॅरोलवर सुटलेल्या गुरमितसिंघ सेवादार व रविंद्रसिंग राठोड याच्यावर सराईत आरोपीने 10 गोळ्या झाडल्या होत्या. नियोजनबद्ध पद्धतीने गोळीबार करून सदरचा आरोपी दुचाकीवरून फरार झाला होता. या गोळीबारात रविंद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला होता, तर सेवादार हा जखमी झाला होता. सेवादार याला बबर खालसाचा दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या याचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पॅरोलवर सुटून तो नांदेड येथे आला होता.

दरम्यान, हल्लेखोर गोळीबार करून दुचाकी क्र. एमएच 26, बीके 1564 वर बसून पळून गेला होता. सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला होता. तो मूळचा नांदेड येथील रहिवासी नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. कुणाच्यातरी मदतीने त्याने हा हल्ला घडवल्याचा संशय पोलिसांना होता आणि त्याच दृष्टीने तपास सुरू होता.

पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, संतोष तांबे यांच्यासह पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. यात पोलिसांना यश आले असून हल्लेखोरांना मदत केल्याप्रकरणी मनप्रितसिंग उर्फ मन्नु गुरूबक्षसिंग ढिल्लो (वय – 31 रा. शहिदपुरा, नांदेड) आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबूसिंघ कारपेंटर (वय – 25, रा.शहिदपुरा, नांदेड) या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून एक बिना नंबरची दुचाकी गाडी आणि एक काळ्या रंगाची, काचांना काळी फिल्म लावलेली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच. 26 सी.डी. 1699 अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या वृत्तास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला.