Nanded crime news – जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 13 जणांना पकडलं, लाखो रुपये जप्त

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे व नायगाव पोलीस ठाण्याच्या सीमेवर चालणाऱ्या जुगार अड्डयावर शनिवारी सायंकाळी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धाड टाकली आहे. पंचवटी हॉटेलच्या पाठीमागे शिवारातील शेतात शेडवर तिर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या एकूण 13 जणांना पोलिसांनी पकडले असून लाखो रुपये जप्त केले आहे.

नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत कारवाई केली जात आहे. अवैध धंदे रोखण्यासाठी 6 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दिवाळीत नायगाव तालुक्यातील नायगाव आणि कुंटूर पोलीस ठाण्याच्या सीमेवर एका शेताच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी छापा टाकून 13 जणांना पकडले आहे. या कारवाईदरम्यान लाखो रुपयांसह मोबाईल, वाहनेही जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, हद्दीच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यासाठी होत असलेला विलंब लक्षात घेऊन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनीच थेट कुंटूर पोलीस ठाणे गाठले. थेट कुंटूर पोलीस ठाण्यात उप महानिरीक्षक पोहोचल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. उमाप यांनी कुंटूर ठाण्यात जवळपास दोन तासाहून अधिक काळ तळ ठोकला होता.