…तर मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये घुसून नामकरण करू! नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समितीचा निर्वाणीचा इशारा 

आधुनिक मुंबईचे शिल्पकार, रेल्वेचे जनक नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला द्यावे, यासाठी आम्ही 1996 पासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. आता आमच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आहे. रेल्वे दिनी 16 एप्रिलला आम्ही पहिल्यांदाच घोषणा देत जोरदार मागणी करणार आहोत. सरकारने नामांतर केले नाही तर प्रथम ठिय्या आंदोलन करू आणि त्यानंतरही ऐकले नाही तर मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये घुसून नामकरण करू, असा इशारा नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समितीने सरकारला दिला आहे.

नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समितीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन नाना शंकरशेट यांनी मुंबई घडवताना केलेल्या योगदानाचा राज्य आणि केंद्र सरकारलाही विसर पडल्याची खंत व्यक्त केली. मुंबई सेंट्रलचे नामकरण करण्यात सरकार टाळाटाळ करत आहे. ही उपेक्षा किती वर्षे सहन करणार असा सवाल संघर्ष समितीचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. मनमोहन चोणकर यांनी केला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते  सुरेंद्र शंकरशेट, डॉ. गजानन रत्नपारखी, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, दिनकर बायकेरीकर, चंद्रशेखर दाभोळकर उपस्थित होते.

शिवसेनेकडून सातत्याने पाठपुरावा 

शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत सातत्याने हा प्रश्न लावून धरला आहे. शिवसेना सचिव  विनायक राऊत यांनीही यासाठी पाठपुरावा केला. आता तर पेंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिफारस केली आहे.

केंद्र सरकारला जाग कधी येणार

उत्तर प्रदेशमधील अनेक शहरे आणि स्थानकांची नावे केंद्र सरकारने झटपट बदलली. मुंबईतील ओशिवरा, एल्फिन्स्टन, कुर्ला टर्मिनसची नावे राम मंदिर, प्रभादेवी आणि टिळक टर्मिनस अशी झाली. मात्र 1996 पासून सातत्याने केल्या जात असलेल्या आमच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्येक रेल्वे दिनी 16 एप्रिलला आम्ही मूक निदर्शने करतो, पण या वेळी नामांतरणासाठी 12 मार्चपासून 16 एप्रिलपर्यंत मोहीम राबवत आहे. या मोहिमेचा भाग पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ई- मेल करतोय. केंद्र सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. केंद्र सरकारला जाग कधी येणार, असा सवाल चोणकर यांनी केला.