नितेश राणे यांचे हे वक्तव्य दोन समाजांत तेढ निर्माण करणारे आहे. अशा लोकांना लोकशाही मान्यच नाही, ही सत्तेची गुर्मी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगत सडकून टीका केली.
नितेश राणे यांनी आज एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करून ‘पोलीस माझे काही वाकडे करू शकणार नाहीत, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे,’ असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना नांदेडात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. अशा लोकांना लोकशाही मान्यच नाही, हिंदू-मुस्लिमांमध्ये अशा प्रकारे वाद निर्माण करून महाराष्ट्रातील शाहू-फुले-आंबेडकरी विचारांना संपविण्याचे पाप अशा मंडळींकडून होत आहे. हे सर्व काही भयानक असून, महाराष्ट्राची जनता आता भाजपला माफ करणार नाही, सत्तेची गुर्मी आलेले लोक अशी वक्तव्ये करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. नितेश राणेचे हे वक्तव्य दोन समाजांत तेढ निर्माण करणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमची एकच भूमिका आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत आघाडीत सहभागी होतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या आदेशावरून राज्य सरकारने मराठा समाजासह ओबीसींचीदेखील फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नितेश राणे यांचे हे वक्तव्य खूप गंभीर आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कुणीही करू नयेत, राज्यात आणि देशात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षातील लोकांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, नितेश राणेंकडून अशा प्रकारचे वक्तव्य अपेक्षित नाही, सत्ताधारीच नव्हे तर कोणीही अशा प्रकारे वक्तव्य करू नये, अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी केली आहे.