भाजप तोतया पार्टी आणि तो आयपीएस अधिकारीही तोतया, बिटकॉईनबाबतचे आरोप नाना पटोले, सुप्रिया सुळे यांनी फेटाळले

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून बिटकॉईनचा वापर केल्याबाबत भाजपने केलेला आरोप कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावला आहे. भाजपने रवींद्र पाटील नामक जो आयपीएस अधिकारी उभा केला आहे तो मुळात आयपीएसच नाही. तो एक तोतया आहे. भारतीय जनता पार्टी हा एक तोतया पक्ष आहे आणि तो आयपीएस अधिकारीही तोतया आहे, असे नाना पटोले म्हणाले.

मी एक शेतकरी माणूस आहे. बिटकॉईनचा कोणताही प्रकार मला माहीत नाही. माझा कधी त्याच्याशी संबंधही आला नाही. मी याविषयी कायदेशीर नोटीस बजावली आहे. काल एफआयआरही दाखल केला आहे. त्यांच्यावर मानहाणीचा दावाही दाखल केला जाईल. सुधांशू त्रिवेदी असो किंवा रवींद्र पाटील असो, त्यांनाही मानहानीची नोटीस बजावली जाईल, असे नाना पटोले म्हणाले.

ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाजच नाही

माझ्यासारख्या शेतकऱयाच्या मुलाची हे लोक या पातळीवर जाऊन बदनामी करत असतील तर सर्वसामान्यांचे काय? भाजप ही खोटे बोलणारी पार्टी आहे. आता त्यांचा त्याच पातळीवर सामना केला जाईल. मी माझ्या आयुष्यात बिटकॉईन पाहिले नाही. काल रात्री मी ती ऑडिओ क्लिप ऐकली. त्यात माझा आवाजच नाही. माझा आवाज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ओळखू येतो. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

ते व्हॉइस रेकार्ंडग खोटे, आवाज माझा नाही

बिटकॉईनसंदर्भातील ते व्हॉइस रेकार्ंडग खोटे आहे. तो आवाज माझा नाही. काल संध्याकाळी मला माध्यमांमधून याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पह्न करून सांगितले की, काही बनावट रेकार्ंडग फिरत आहेत आणि मला सायबर क्राइमकडे तक्रार करायची आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही तक्रार करा. मी काल संध्याकाळीच ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुधांशू त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना यासंदर्भात मी आज सकाळीच मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिले की, बाहेर येऊन उत्तर द्यावे. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. सुधांशू त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनलवर, ज्या वेळी मला बोलवतील त्या वेळी मी जाऊन उत्तर देईन, असे सुळे यांनी सांगितले.

भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो पाहा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरून भाजपवर तोफ डागली. जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती, त्याची नोंद तरी का घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घ्यायची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. असे आरोप करून भाजपा किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचं हे उदाहरण आहे, अशी तोफही त्यांनी डागली. तोतया आयपीएसने केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.