निवडणूक आयोग बिंग फुटेल म्हणून म्हणून मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला घाबरत आहेत – नाना पटोले

विधानसभा निवडणूकीचा निकाल मान्य नसल्याने सोलापूरमधील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी बॅलोट पेपरवर मतदान आयोजित केले होते. मात्र हे मतदान रोखण्यासाठी या गावात पोलिसांनी कलम 144 लागू केले. यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व निडणूक आयोगाला फटकारले आहे. तसेच त्यांनी ट्विट करत मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम ठोकला आहे.

”विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, 3 डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून? EVM वरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे”, असे नाना पटोले यांनी ट्विट केले आहे. तसेच मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली. काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल”, असेही ते या ट्विटमध्ये म्हणाले.