महायुती सरकारनं दावोसमधून आणलेल्या गुंतवणुकीसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, काँग्रेसची मागणी

दावोसमध्ये 61 कंपन्यांशी केलेल्या करारातून 15.70 लाख कोटींची गुंतवणूक व 15.95 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत म्हणून महायुती सरकारने दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक व त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

दावोसमध्ये फडणवीस यांनी करार केलेल्या 61 कंपन्यांमधील 51 कंपन्या हिंदुस्थानातीलच आहेत, यातील 43 कंपन्या मुंबई-पुण्याच्या, तर काही कंपन्यांची कार्यालये मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरच आहेत फक्त दहा कंपन्या विदेशातील आहेत. सिडको आणि बुक माय शो यांच्या मध्ये दावोस येथे 1500 कोटी रूपयांचा करार करण्यात आला. ‘कोल्ड प्ले’च्या तिकीट विक्रीचा काळाबाजार केल्याप्रकरणी ‘बुक माय शो’ची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. तर बोगस कागदपत्रे तयार करून पवईतील जयभीम नगरमध्ये तोडक कारवाई केल्याप्रकरणी चौकशी सुरु असलेल्या हिरानंदानी कंपनीसोबतही सरकारने करार केला आहे. तसेच या कंपनीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीही सुरु आहे. गुन्हेगार कंपन्यांसोबत करार करून सरकार त्यांना काळाबाजार करण्याची सूट देत आहे का? असा सवाल पटोले यांनी केला

मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केला त्यात दारु बनवणा-या हेनिकेन या कंपनीसोबत 750 कोटी रुपयांचा करार केला आहे. तर AB in Bev या दुस-या बियर उत्पादक कंपनीसोबत 1500 कोटी रुपयांचा करार केला आहे. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणात्मक तत्त्वांच्या (DPSP) अंतर्गत अनुच्छेद 47 मध्ये म्हटले आहे की, राज्याने आरोग्यास हानीकारक असलेल्या मादक पेये व औषधांचे वैद्यकीय कारणांशिवाय सेवन प्रतिबंधित करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण भाजपा सरकार दारुच्या कंपन्यांशी करून करून महाराष्ट्राला आता दारुराष्ट्र बनवायला निघाले आहे, असे पटोले म्हणाले.

जालन्याच्या धनश्री मंधानी यांच्या प्रायम कंपनीसोबत ड्रोन तयार करण्यासाठी करार केला आहे. ही कंपनी 6000 ड्रोनचे उत्पादन करणार आहे असे सांगितले जात आहे. या कंपनीकडे 10 हजार स्केवर फुट जागेवर ड्रोन उत्पादन फॅक्टरी असल्याचा दावा केला जात आहे पण प्रत्यक्षात तिथे कोणतीही फॅक्टरी नसून तेथे स्टीलचे उत्पादन केले जाते. ही कंपनी ड्रोनचे उत्पादन करत नाही तर परदेशातून पाडलेल्या ड्रोनचे पार्ट आणून त्याची फक्त असेंब्लींग करते असेही पटोले म्हणाले.

उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला? शरद पवार यांची सडकून टीका

आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दावोसमध्ये असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय मुंबईत येऊन महाराष्ट्रातून 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक छत्तीसगडमध्ये घेऊन गेले हे विशेष. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव पुण्यात येऊन आपल्या राज्यातल्या उद्योजकांना भेटून मध्य प्रदेशात उद्योग घेऊन जात आहेत. सरकारने राज्यात गुंतवणूक आणावी पण दावोसमधील गुंतवणुकीच्या नावाने फसवाफसवी करू नये, असेही नाना पटोले म्हणाले.