मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्ट कार्डवर नाही रेट कार्डवर बोलावे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. खोके सरकारने रिपोर्ट कार्डद्वारे केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी असून मिंधे सरकारच्या काळात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे, असे ते म्हणाले.
महायुती सरकारने आज आपले रिपोर्ट कार्ड जाहीर केले. त्यात सरकारने केलेल्या दाव्यांची पोलखोल पटोले यांनी केली. पंत्राटदारांचे आणि अधिकाऱयांच्या बदल्यांचे रेट या सरकारने ठरवले होते. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र विकासामध्ये आघाडीवर होता, पण गुजरातच्या हस्तकांनी मागील दोन वर्षांत महाराष्ट्राची पुरती वाट लावली, अशी टीकाही पटोले यांनी केली.
दोन वर्षात महाराष्ट्रात जाती धर्मात तेढ निर्माण करून राज्यात अशांतता पसरवण्याचे काम केले. आरक्षणाच्या नावावर जाती जातीत भांडणे लावली, कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावली असून जंगलराज झाले आहे. महिला सुरक्षित नाहीत, शाळेत मुली सुरक्षित नाही व सत्ताधारी पक्षाचे नेतेही सुरक्षित नाहीत ही या सरकारची कामगिरी आहे.
महाराष्ट्र हे मोदी–शहांचे एटीएम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने खोके सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे, महाराष्ट्र हे मोदी-शहांसाठी फक्त एटीएम आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. उद्योगधंदे गुजरातला व गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप खोके सरकारने केले आहे. मुंबईतील महत्त्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घातल्या व टेंडर मागून टेंडर काढून पंत्राटदारांचे भले केले. त्यातून मलई खाण्याचे काम दोन वर्षे बिनबोभाटपणे सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.