राज्यातील शेतकऱयाला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली, पण महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच शेतकऱयांना पुन्हा कर्जमाफी देण्यात येईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले
या वर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱयाला करावा लागला. आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजून पावसाची प्रतीक्षा आहे, काही भागात दुबार पेरणीचे संकट आहे. बोगस खते बी-बियाण्यांचा सुळसुळाट आहे, पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करते. पीक विम्याचा फायदाही शेतकऱयाला मिळत नाही तर पीक विमा पंपन्यांनाच मोठा फायदा होतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे मागील सहा महिन्यांत राज्यात 1 हजार 727 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नसल्याचे ते म्हणाले.
उद्योगपतींचे कर्ज माफ, पण बळीराजा दुर्लक्षित
महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांचे 1 हजार 700 कोटी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मोठय़ा उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजप सरकारने माफ केले, पण शेतकऱयांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.