लोणावळा येथील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत आज स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला जाब विचारला. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत हे स्पष्ट करा अशी मागणी त्यांनी केली.
भुशी डॅममध्ये झालेली दुर्घटना दुर्दैवी असून पावसाळ्यात अशा घटना वारंवार होत आहेत. पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातील धऱणांवरही पर्यटक मोठय़ा संख्येने भेट देत असतात. सुरक्षा देऊ, उपाययोजना करू अशी मोघम उत्तरे नकोत, नेमके काय केलेय ते सांगा असे पटोले म्हणाले.
आझाद मैदानावर अन्यायग्रस्त लोक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून काहीच सुविधा नाहीत. प्रचंड चिखल झाला आहे. सरकार तेथेही दुर्घटना होण्याची वाट पहात आहे का? लोकांच्या समस्यांकडे राज्य सरकार गांभिर्याने पाहतच नाही असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला.
पवईतील जयभीमनगरमधील 650 मागासवर्गीय कुटुंबे पावसाळ्यात आजही रस्त्यावर रहात आहेत. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले असतानाही अद्याप ती कुटुंबे उघडय़ावरच आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाचेही सरकार पालन करत नसेल तर ही गंभीर बाब आहे असेही पटोले म्हणाले.